नागपूरमध्येही ड्रंक अँन्ड ड्राइव्ह ! मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत चिमुकल्यासह ७ जण जखमी

Nagpur | Drunk and drive – पुण्यातील कल्याणीनगर येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच नागपुरातही ड्रंक अँन्ड ड्राइव्हची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिन्याच्या चिमुकल्यासह ७ जण जखमी झाले आहेत. यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने एका दुचाकीसह काही पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेमध्ये महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकल्यासह ७ जण जखमी झाले आहे. यात तीन महिन्याच्या बाळाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शुक्रवारी (ता. 24 मे) संध्याकाळी दाटीवाटीचा आणि वर्दळीचा परिसर असलेल्या झेंडा चौकात एक भरधाव कार आली आणि काही कळण्याच्या आतच या कारने तीन पादचाऱ्यांना उडवले. जेव्हा ही घटना घडली, लोकांनी लगेच त्या गाडीतील तरूणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीतील इतर दोनजण पळून गेले होते.
मात्र त्यावेळी एक तरूण लोकांच्या हाती लागला. लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर नागरिकांनी जखमी झालेल्या तिघांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण संतप्त झालेल्या नागरिकांनी या गाडीची नासधूस केली, या गाडीच्या काचाही फोडल्या. तर, पोलिसांनी आता तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
वाहनात दारुच्या बाटल्या…
या चारचाकी वाहनातील तिनही तरुणांनी मद्यपान केले होते. त्यामुळे ते तिघेही नशेत होते. पोलिसांना या वाहनातून दारूच्या बाटल्या आणि गांजासदृष्य वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तिन्ही आरोपींनी अंमली पदार्थांची नशा केली होती का? हे पाहण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.





