पुण्यातील कात्रज परिसरातून 21 लाखांचे मेफेड्रोन जप्त; 2 जणांना अटक

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात मागच्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्याच्या कात्रज परिसरातून 21 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून पोलिसांनी राजस्थानमधील दोघांना अटक केली आहे. कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी दोन तरुण आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून ड्रग्जची विक्री करणाऱ्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
आरोपीच्या ताब्यातून 21 लाख 38 हजार रुपयांचे 106 ग्रॅम मेफेड्रोनसह व दुचाकी असा 22 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (वय 22, मूळ रा. नयानगर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि महेश पुनाराम बिश्नोई (वय 20, मूळ रा. कुशलावा, जि. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानीनगरमध्ये राहतात. या दोघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





