पिंपरी | एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली नशेचा बाजार

नाणे मावळ, (वार्ताहर) – हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच एनर्जी ड्रिंकची भुरळ आहे. परंतु सातत्याने एनर्जी ड्रिंक पिणे आरोग्यासाठी घातक आहे. सध्या मावळ तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंडपेय उपलब्ध आहेत.
कोणत्याही दुकानावर सहजरित्या दहा-वीस रुपयांत ही पेय मिळतात. एनर्जी ड्रिंकमधून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, विद्यार्थी, मोठी माणसे या नशेच्या आहारी जात असल्याचे गंभीर चित्र दिसत आहेत.
कोणत्याही किराणा दुकानात, हॉटेल, पानटपरी आदी ठिकाणी एनर्जी ड्रिंकच्या बाटल्यांनी कप्पेच्या कप्पे भरलेले दिसतात. एनर्जी ड्रिंकच्या मोकळ्या बाटल्यांचा ढीग पाहून ती किती प्रमाणात प्यायली जात असतील, याचा अंदाज येतो. सहज आणि कमी पैशात ही पेये मिळत असल्याने लहान मुले, विद्यार्थी याच्या नशेच्या आहारी गेली आहेत.
उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी रात्री झोप येऊ नये म्हणून अशा एनर्जी ड्रिंकचा सहारा घेतात. वाहन चालक देखील अशा पेयांचे मोठ्या प्रमाणात सेवन करताना दिसतात.
तर लहान मुले देखील पार्टी करताना अशा बाटल्या तोंडी लावताना दिसत आहेत. हे चित्र अत्यंत गंभीर असून सर्वांना विचार करायला लावणारे आहे.
लहान मुले, विद्यार्थी यांच्या पालकांना या प्रकारामुळे आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कॅफेनचे प्रमाण अति असल्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर एनर्जी ड्रिंकचा विपरित परिणाम होतो. यातून गंभीर आजारांचा धोका संभवतो.
प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शरीरास हानिकारक एनर्जी ड्रिंक बाजारातून काढून घ्यावीत. तसेच त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी अथवा नियमावली बनवावी, अशी प्रतिक्रिया संतोष गायकवाड यांनी दिली.
एनर्जी ड्रिंकचा नशेसाठी वापर –
काही एनर्जी ड्रिंक प्यायल्या नंतर बराच काळ डोळे ताठर होतात. बऱ्यापैकी गुंगी येते. तोंडाचा वास येत नाही. तर अशी झिंगलेली अवस्था साधारण तीन ते चार तास राहते. एकप्रकारची नशा एनर्जी ड्रिंक पिणाऱ्याला चढते.
सध्या याचा धोका माहीत नसलेले अनेकजण एनर्जी ड्रिंकच्या नकळत आहारी गेले आहेत. अनेकदा एनर्जी ड्रिंकच्या बाटलीवर त्यातील घटक लिहिलेले असतात. तर त्याचे पिण्याचे प्रमाण लिहिलेले असतात. परंतु विक्रेता आणि ग्राहक दोघेही याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.





