प्रभात वृत्तसेवा नाणे मावळ – विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या मावळ तालुक्यात आजही काही दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये महिलांचे दैनंदिन कष्ट कायम असल्याचे वास्तव समोर येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गॅस कनेक्शन, विविध शासकीय योजना अस्तित्वात असतानाही अनेक गावांमध्ये आजही महिलांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी जंगलांवर अवलंबून राहावे लागत आहे. पहाटेच्या अंधारात घराबाहेर पडून डोक्यावरून जड लाकडांचे ओझे वाहत घरी परतणाऱ्या महिलांचे चित्र आजही मावळच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.मावळ तालुक्यातील नाणे मावळ, आंबवणे, सुदुंबरे, जांभिवली, शिरगाव, भाजे, पवन मावळ परिसरातील काही दुर्गम व आदिवासी वस्तीमध्ये ही परिस्थिती अधिक तीव्रतेने जाणवते. अनेक घरांमध्ये गॅस कनेक्शन असले तरी सिलिंडर भरण्याचा खर्च परवडत नसल्याने पारंपरिक चुलीचाच वापर केला जात आहे. काही ठिकाणी अद्याप गॅस कनेक्शन पोहोचलेले नसल्याचेही वास्तव आहे.दररोज पहाटे महिला अनेक किलोमीटर अंतर चालत जातात. जंगलातून सुकलेली लाकडे गोळा करून ती डोक्यावर उचलून पुन्हा गावाकडे परत येतात. उन्हाळ्यात तीव्र उकाडा, पावसाळ्यात निसरडे रस्ते आणि थंडीच्या दिवसांत बोचरी हवा, कोणताही ऋतू असो, या महिलांचे कष्ट मात्र कमी होत नाहीत. आर्थिक अडचणी आड येतात गॅस सिलिंडर आहे, पण भरायला पैसे नाहीत, अशी खंत अनेक महिलांनी व्यक्त केली. महागाई वाढलेली असताना दैनंदिन खर्च भागवताना सिलिंडर भरणे अनेक कुटुंबांना परवडत नाही. काही ठिकाणी वाहतुकीची सोय नसल्याने गॅस सिलिंडर आणणेही कठीण ठरते. त्यामुळे लाकूड मोफत मिळते या समजुतीतून महिलांना जंगलात जावे लागत आहे. शासन योजनांची अंमलबजावणी आवश्यक केंद्र व राज्य शासनाने महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजनांसारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मात्र दुर्गम भागात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. काही गावांमध्ये माहितीअभावी महिलांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचेही समोर आले आहे.