पिंपरी | पर्यटन’वारी’ : निसर्गवेड्यांना भुरळ घालणारे ‘नाणे मावळ’

पिंपरी, (विशाल कुंभार) – पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेल्याने मावळ तालुक्यातील निसर्ग चांगलाच बहरला आहे. पावसाळा म्हटलं की निसर्गाची सफर करायला पर्यटकांची पाऊले अपोआप घराबाहेर पडतात.
त्यातही निसर्ग पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर मावळ तालुक्याहून सुंदर दुसरी जागा नाही. ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन लेण्या, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, मोठमोठे धबधबे, अनेक धरणे, प्राचीन मंदिरे आणि हिरवाईने नटलेला प्रदेश अशी निसर्ग सौंदर्याची खाण म्हणजे मावळ तालुका.
मावळ तालुक्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यातही धुक्याने वेढलेली गावे, हिरवा शालू नेसलेली धरत्री, प्राचीन मंदिरे, लेण्या आणि गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध ठिकाणे यामुळे नाणे मावळ हा भाग निसर्गवेड्या पर्यटकांना हमखास भुरळ घालतो.
पावसाळ्यात पर्यटकांना अस्सल निसर्ग सौंदर्याची अनुभूती करून देणारे ठिकाण म्हणजे नाणे मावळ. पर्यटक, गिरिप्रेमी, निसर्ग प्रेमी या सर्वांचेच पावसाळी पर्यटनाचे वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणजे आपले नाणे मावळ.
नाणे मावळात काय पाहाल ?
वडीवळे धरण – तीर्थक्षेत्र देहू, आळंदी यांना जिथून पाणी जाते ते म्हणजे वडीवळे धरण. वडीवळे धरणामुळे नाणे मावळच्या निसर्ग सौंदर्यात आणखीन भर पडली आहे.पाले उकसाण लेणी – वर्षाविहारासाठी आणि भटकंतीसाठी दर्जेदार आणि पुरातन असलेली पाले-उकसाण लेणी देखील नाणे मावळ भागातच आहे. पाले लेणी अतिप्राचीन असून येथे भिंतीवर अनेक शिलालेख आहेत.
कोंडेश्वर शिवमंदिर – छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने हे शिव मंदिर पावन झाल्याचे स्थानिक सांगतात. जांभवली गावात हे अतिप्राचीन शिवमंदिर असून ग्रामस्थांनी देखील जीर्णोद्धार करून हे मंदिर आणखीन सुंदर बनविले आहे. इथेच इंद्रायणीची उपनदी कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे.
ढाक बहिरी – ढाक बहिरी अर्थात ढाक किल्ला जो की गिर्यारोहकांसाठी आवडते ठिकाण आहे, तिथे जाण्याचा मार्गही नाणे मावळातूनच जातो. जांभवली गावातून दोन तासांच्या पायवाटेने गेल्यावर हा किल्ला आहे. तसेच येथील कातळकडा देखील पाहण्याजोगा आहे.
नाणे मावळात कसे जाल?
१. कामशेत शहरातून नाणे गाव मार्गे वडीवळे धरण १२ किलोमीटर अंतरावर आहे.
२. नाणे मार्गे गोवित्री नदी, पुढे कुंडलिका नदीच्या अलिकडे उकसाण-पाले गावाकडे जाण्यासाठी मार्ग आहे.
३. कामशेत ते जांभवली गावापर्यंतचा संपूर्ण प्रदेश नाणे मावळ म्हणून ओळखला जातो. वाटेतील नाणे गावावरून या भागाला नाणे मावळ म्हटले जाते.
पर्यटनाला या पण काळजी घ्या –
१. कामशेत शहर ते कोंडेश्वर मंदिर आणी पुढे ढाक बहिरी हा रस्ता २१ ते २५ किलोमीटर आहे, या मार्गावर कुठेही पेट्रोलपंप नसल्याने कामशेतमधून आत जातानाच पेट्रोल भरून घ्यावे.
२. प्रवासात प्रथमोपचार कीट सोबत असावे.
३.गिर्यारोहणाचा आनंद घ्यावा, मात्र धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.
४. प्रवासापूर्वीच आपले वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.
५. स्थानिक आणि पोलिसांच्या सुचना पाळाव्यात.





