Graduation Admissions Drop: देशात पहिल्यांदाच पदवी प्रवेशात ९३ हजारांची घट! पारंपरिक शिक्षणाला विद्यार्थ्यांची पाठ?
Graduation Admissions Drop: डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ लाखांच्या पार; लवकरात लवकर रोजगाराच्या शोधात तरुणाईचा मोठा निर्णय.

Graduation Admissions Drop – राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’च्या अहवालानुसार देशात पदवी स्तरावरील प्रवेशात तब्बल ९३ हजारांची घट नोंदवण्यात आली. २०११ पासून हा सर्व्हे सुरू झाल्यापासून पदवी प्रवेशांमध्ये घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एकीकडे देशात पदवी प्रवेश घटत असताना, दुसरीकडे पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे. शिक्षण मंत्रालयाने नुकतेच सन २०२२-२३ आणि सन २०२३-२४ या दोन वर्षांचे अहवाल एकत्रितपणे जाहीर केले आहेत. देशात उच्च शिक्षण संस्थांची संख्या ५६,१८० वरून ५९,५३३ पर्यंत वाढलेली असतानाही पदवी प्रवेश कमी होणे हे चिंतेची बाब ठरत आहे.
२०२२-२३ मध्ये देशात ३ कोटी ४६ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी पदवीसाठी नोंदणी केली होती, ती २०२३-२४ मध्ये घटून ३ कोटी ४५ लाख ८२ हजारांवर आली आहे. ही घट प्रामुख्याने कला, विज्ञान आणि वाणिज्य या पारंपरिक शाखांमध्ये दिसून येत आहे.
मुलांच्या प्रवेशात घट, मुलींची किरकोळ वाढ
राष्ट्रीय स्तरावर पदवी अभ्यासक्रमात मुलांच्या प्रवेशात २.२ टक्क्यांची घट झाली आहे, तर मुलींच्या प्रवेशात १.८ टक्क्यांची अल्प वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, दीर्घकालीन पारंपरिक पदवी शिक्षण घेण्याऐवजी लवकरात लवकर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘डिप्लोमा‘ अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. २०१९-२० मध्ये देशात २६.७२ लाख विद्यार्थी डिप्लोमा करीत होते, ही संख्या २०२३-२४ मध्ये ३३.१५ लाखांवर पोहोचली आहे.
पदवी प्रवेश घट होण्याची कारणे
१. पारंपरिक पदवीनंतर रोजगाराच्या अपुऱ्या संधी
२. कौशल्य आधारित शिक्षणाला प्राधान्य
३. वाढता शैक्षणिक खर्च व आर्थिक कारणे
४. पदवी अभ्यासक्रम गरजेनुसार अपडेट नसणे
५. ऑनलाइन व दूरशिक्षणाचा पर्याय उपलब्ध





