नाल्यांवरील अतिक्रमणांवर ड्रोनची नजर

महापालिका प्रशासनाचा निर्णय : तातडीने अंमलबजावणी करणार
पुणे – महापालिका हद्दीतील प्रमुख नाल्यांचे ड्रोनद्वारे नियमित सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मल:निस्सारण विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार असून हे ड्रोन महापालिका विकत घेणार आहे.
यंदा आंबिल ओढ्याला आलेल्या महापुरानंतर शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुन्हा समोर आला आहे. आंबिल ओढ्याच्या उगमापासून ते मुठा नदीला मिळेपर्यंत सुमारे 20 ठिकाणी प्रचंड अतिक्रमणे झाली असून त्यामुळे ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. परिणामी, दि.25 सप्टेंबरला दक्षिण पुण्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने आंबिल ओढ्यालगतच्या तब्बल दहा हजारांवर घरांना पुराचा फटका बसला.
आंबिल ओढ्याप्रमाणेच शहरातील इतर सर्व नाल्यांचीही तीच स्थिती असून, नाल्यात राडारोडा टाकून तसेच परस्पर रिटेनिंग वॉल टाकून जागा तयार केल्या जात आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण रोखणे महापालिकेसाठी मोठे आव्हान बनले आहे. नाल्यांलगत आतमध्ये गुपचूप अतिक्रमणे होत असल्याने त्यावर लक्ष ठेवणे प्रशासनास शक्य होत नाही. तर, अशा घटनांनंतर केलेल्या सर्वेक्षणात ही अतिक्रमणे समोर येतात. त्यामुळे भविष्यात नाल्यांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सदस्यांकडून ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. ते परिणामकारक असल्याने यापुढे नाल्यांचे ड्रोन सर्वेक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे.
पालिका खरेदी करणार ड्रोन
या सर्वेक्षणासाठी आवश्यक ड्रोन मल:निस्सारण विभागानेच खरेदी करावेत, असे पत्र बांधकाम विभागाने दिले आहे. बाजारात उपलब्ध ड्रोनच्या किंमती कमी असल्याने ते खरेदी करणे सोयीस्कर ठरणार असून त्या माध्यमातून नियमितपणे नाल्यांचे सर्वेक्षण करावे, असे या पत्रात म्हटले आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षण करताना ते स्पष्ट आणि प्रत्यक्ष जागेवर ड्रोन पोहचत असल्याने सहज शक्य होते. त्यातच, हे ड्रोन फक्त या कामासाठीच नाही, तर पालिकेच्या इतर सर्वेक्षण तसेच उपक्रमांसाठीही वापरणे शक्य होणार आहे. त्यामुळे हे खरेदी करण्याच्या सूचना पत्रात करण्यात आल्या आहेत.



