Akshaye khanna | jaideep ahlawat | Drishyam 3 – बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी सस्पेन्स-थ्रिलर फ्रँचायझी ‘दृश्यम’ च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका प्रोमोद्वारे ‘दृश्यम ३‘ची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुसऱ्या भागात आपल्या भेदक अभिनयाने साळगावकर कुटुंबाची झोप उडवणारा अभिनेता अक्षय खन्ना तिसऱ्या भागात दिसणार नाहीये. त्याच्या जागी आता एका अत्यंत ताकदीच्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. अक्षय खन्नाच्या जागी कोण असणार? ‘दृश्यम २’ मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अक्षय खन्नाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, तिसऱ्या भागात त्याच्या जागी ‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावत साळगावकर कुटुंबाचा छडा लावताना दिसणार आहे. जयदीप एका महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. का घेतली अक्षय खन्नाने एक्झिट? मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये दोन मुख्य कारणांमुळे खटका उडाला. अक्षयने या चित्रपटासाठी तब्बल २१ कोटी रुपयांची मागणी केली होती, जी निर्मात्यांच्या बजेटच्या बाहेर होती. तसेच चित्रपटातील लुक आणि विग वापरण्यावरूनही अक्षय आणि निर्मात्यांचे एकमत झाले नाही. या कारणांमुळे अखेर अक्षयने या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कधी सुरू होणार शूटिंग? दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर हे कलाकार आपल्या जुन्याच भूमिकांमध्ये कायम आहेत. जयदीप अहलावत जानेवारी २०२६ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. ‘दृश्यम ३’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. साळगावकर कुटुंबाचे रहस्य आता कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे हा सिनेमा रसिकांसाठी चांगली मेजवानी ठरणार आहे.