वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी; रामभाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश

वाघोली: परिसरातील साई सत्यम पार्क भागातील अनेक लोक वस्तीसाठी कमी प्रमाणात असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नातून दिलासा मिळणार आहे. खराडी ते साई सत्यम पार्क पाण्याची लाईन कामासाठी जवळपास 50 लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. रामभाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाघोली तालुका हवेली येथील साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, कोलते पार्क, गणेश पार्क, रोज गार्डन या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे ग्रामपंचायत कडून होणारा पाण्याचा पुरवठा कमी पडू लागला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्याकडे पाणी प्रश्न मांडला होता.
लोकसंख्या वाढीमुळे पूर्वीचे योजनेतून वाढीव पाण्याचा पुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे दाभाडे यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे भामा आसखेड प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्याला विलंब होणार असल्याने खराडी येथून साई सत्यमपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकावी यासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी पुणे महानगरपालिकेने आर्थिक विकास आराखड्यात 50 लाखांची तरतूद करून निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे.
या कामाची वर्क ऑर्डर प्राप्त झाले असून येत्या आठवडाभरात कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे आता या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. याबाबत नागरिकांनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, तत्कालीन आयुक्त, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचे आभार मानले आहेत





