राज्यातील ११४ मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू; तोकडे कपडे घातल्यास प्रवेश नाही

नागपूर – काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तोकडे, असभ्य कपडे परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचा नियम करण्यात आला होता. मात्र यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंदिर संस्थांनाच्यावतीने हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर नागपुरमधील चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू (वस्त्र संहिता) करण्यात आल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने घोषणा केली होती. अमरावतीमध्येही ८ मंदिरामध्ये ड्रेससक्ती करण्यात आली. त्यानुसार आता ११४ मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत.
नागपूर, नाशिक, अमरावती, जळगाव, अकोला, धुळे, कोकण मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील १८ मंदिरांचा समावेश आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिली आहे. माहीम येथील शीतलादेवी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे समन्वयक सुनील घनवट ही घोषणा केली आहे.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ७ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात झालेला निर्णय एकमताने संमत करण्यात आला. असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये आणि मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे, यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूरमधील संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप या मंदिर ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मात्र मंदिरातील ड्रेसकोडच्या निर्णयावर काही लोक आक्षेप घेत आहे. तर काही जण पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड लागू करण्यास सांगत आहे. त्यामुळे सध्या मंदिरातील ड्रेसकोड प्रकरणी नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.





