पुणे – काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तोकडे, असभ्य कपडे परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचा नियम करण्यात आला होता. मात्र यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंदिर संस्थांनाच्यावतीने हा निर्णय मागे घेण्यात आला. नागपुरातील चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू (वस्त्र संहिता) करण्यात आल्यानंतर पुण्यातही असाच निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर मंदिर हे पुरातन कालीन मंदीर आहे.
दरम्यान या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सातव व उपाध्यक्ष दाभाडे यांनी हा निर्णय यांनी घेतला आहे.