द्रास थंडर मोटरसायकल रॅलीला प्रारंभ; लष्कराच्या उपप्रमुखांनी दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली – ऑपरेशन विजय मध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, द्रास थंडर मोटरसायकल रॅलीला आज नवी दिल्लीतील करियप्पा परेड ग्राउंड येथून लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी (निवृत्त), लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक आणि मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन समारंभ झाला.
द्रास थंडर मोटरसायकल रॅलीमध्ये १३ जम्मू आणि काश्मिर रायफल्स (कारगिल) च्या अधिकारी आणि 19 सैनिकांचा समावेश आहे. सुभेदार मेहर सिंग, वीर चक्र आणि नायब सुभेदार केवल कुमार, सेना पदक, पथकाचे सदस्य, हे ऑपरेशन विजय शौर्य पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांनी पॉइंट ४८७५ आणि पॉइंट ५१४० वर ताबा मिळवण्यात सक्रिय सहभाग घेतला होता.
द्रास थंडर मोटरसायकल रॅली नवी दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंड येथून द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत प्रवास करेल. ही रॅली कारगिल विजय दिवसाच्या रजत जयंती उत्सवाचा एक भाग आहे. 25 वर्षांपूर्वी कारगिल युद्धात विजय मिळवून देणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करणे हा या रॅलीचा उद्देश आहे.
हा चमू १०० हून अधिक शौर्य पुरस्कार विजेते, माजी सैनिक आणि वीर नारींना यादरम्यान भेटणार असून ऑपरेशन विजयमधील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करेल. मोटारसायकल रॅलीचा समारोप २० जून रोजी द्रास येथील ऐतिहासिक कारगिल युद्ध स्मारक येथे होईल.





