भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणार? पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका महापौर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपच्या वतीने बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांना महापौर पदावर संधी देण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी शितल उर्फ विजय शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र शितल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला असून त्रागा करत महापालिका भवन सोडले आहे. याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेविका वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे. रवी लांडगे हे सन २०१७ मध्ये बिनविरोध नगरसेवक झाले होते. तर आताच्या निवडणुकीमध्ये देखील ते बिनविरोध निवडून आले. त्यांना महापौर पदावर संधी देण्यात आली आहे. शितल उर्फ विजय शिंदे हे भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. सन २०१२ साली भाजपचे तीन नगरसेवक असताना ते निवडून आले होते. यावेळी त्यांनी महापौर पदाची मागणी केली होती. मात्र त्यांना महापौर पदावर संधी न देता उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. महापौर पदावर संधी मिळत नसल्याने त्यांनी रागाने महापालिका भवन सोडून जाणे पसंत केले. राष्ट्रवादीला उपमहापौर? दुसरीकडे सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत भाजपने उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. मात्र या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर टीका होऊ लागली आहे. ज्या दिवंगत अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपला खिंडीत गाठले. त्याच भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस उपमहापौर पद घेत सत्ता स्थापन करणार की भाजप उपमहापौर पदासाठी शितल शिंदे अथवा अन्य कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.