Vijay Shivtare: विजय शिवतारेंच्या आयुष्यात मुलगी बनली ‘देवदूत’; मुंबईतील ‘त्या’ ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय घडलं?
Vijay Shivtare: गेल्या काही काळापासून आमदार विजय शिवतारे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते.

Vijay Shivtare: “मुलगी ही घराची लक्ष्मी असतेच, पण संकटाच्या वेळी ती ‘रक्षक’ म्हणूनही उभी राहते,” याची प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. पुरंदरचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांना त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात ही शस्त्रक्रिया आज यशस्वीरीत्या पार पडली.
वडिलांसाठी लेक बनली ‘देवदूत’ –
गेल्या काही काळापासून आमदार विजय शिवतारे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते. प्रकृती खालावत चालल्याने त्यांना तातडीने किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. अशा कठीण प्रसंगी त्यांची कन्या डॉ. ममता यांनी वडिलांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःची किडनी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर –
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रुग्णालयात आज ही प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडली. सध्या पिता आणि कन्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिवतारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
विजय शिवतारे हे ‘बापू’ या नावाने प्रसिद्ध असून ते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी सलग दोनदा विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतरही, २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे.





