प्रभात वृत्तसेवा पुणे – भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला देऊ केलेल्या १५ जागा आम्हाला मान्य नाही. युती सन्मानजनक व्हावी यासाठी शिवसेनेला २५ जागा मिळाव्यात. तसा प्रस्ताव भाजपकडे पाठविला असून, त्याबाबत पुढील २४ तासात निर्णय होईल, अशी माहिती शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रामी ग्रँड येथे जालेल्या शिवसेनेच्या बैठकीस डाॅ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगीरे, अजय भोसले, आबा बागुल आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील निवडणुकांत शिवसेनेला मिळालेल्या जागांची सरासरी पाहिली तर पुण्यात किमान ४५ ते ५० जागा मिळाल्या पाहिजे. भाजप केवळ १५ जागा देत आहे.ही सन्मानजनक युती होवू शकत नाही. किमान २५ जागा मिळाव्यात अशी मागणी आहे. याबाबत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, गणेश बिडकर यांच्याशी चर्चा केली. याबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.युती तुटली तर राष्ट्रवादीबरोबर की स्वतंत्र यावर त्या म्हणाल्या, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. भाजप २५ जागा देतील असा विश्वास आहे. जेथे आमची ताकद आहे, तेथेच आम्हाला जागा हव्यात. आम्हाला हवे असलेले प्रभाग मिळाले नाही तर पुढचा निर्णय घेऊ. युती करायची हे वरिष्ठ पातळीवर निश्चित झाले. निवडून येण्याची क्षमता हा उमेदवाराचा निकष असून, कोणाची क्षमता कुठे आणि किती यावर मतभेद होतात. नाना भानगिरे आणि माझ्यात बाचाबाची झालेली नाही. ते अचानकपणे निघून गेले, असे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले.