Dr. BHVS Narayan Murthy: युद्धात तंत्रज्ञानाला मानवी निर्णयक्षमतेची जोड हवी- डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती
Dr. BHVS Narayan Murthy:

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १५१ वा दीक्षांत समारंभ
Dr. BHVS Narayan Murthy: कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर युद्ध, स्वायत्त यंत्रणा आणि अंतराळ तंत्रज्ञानामुळे युद्धाच्या संकल्पना बदलत आहेत. भविष्यात लष्करला नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि त्याचा प्रभावी वापर करण्याची क्षमता आत्मसात करावी लागेल.
मात्र, तंत्रज्ञानापेक्षा परिस्थितीचे आकलन करून निर्णय घेण्याची मानवी क्षमता महत्त्वाची आहे. दबावात निर्णय घेणे, व्यावसायिक कौशल्य आणि सचोटी या गुणांवरच प्रभावी लष्करी नेतृत्व उभे राहते, असे मत डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडवान्सड टेक्नोलॉजी (डीआयएटी), पुणेचे कुलगुरू डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५१ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या वेळी ३६४ कॅडेट्सना पदवी दिली. यामध्ये १४ महिला कॅडेट्सचा समावेश आहे. एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, उपकमांडंट रिअर ॲडमिरल बी. एस. बैन्स, प्राचार्य विनय दीप, प्राध्यापक, कॅडेट्सचे पालक उपस्थित होते.
एनडीएमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कॅडेट्सना एकत्रित प्रशिक्षण दिल्यामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय, परस्पर विश्वास आणि संयुक्त कार्यपद्धतीची समज निर्माण होते. भविष्यात संयुक्त मोहिमा यशस्वी करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मूर्ती यांनी नमूद केले.
प्राचार्य विनय दीप यांनी तुकडीच्या शैक्षणिक कामगिरीची माहिती दिली. विविध शाखांमध्ये आयुष कुमार, गार्गी पालीवाल, दिव्या गोदारा, प्रशांत कुमार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बांगलादेशचा मोहम्मद जाहिरुल बिलाल याची सर्वोत्कृष्ट परदेशी कॅडेट म्हणून निवड झाली. यावेळी १८ परदेशी कॅडेट्स उपस्थित होते.
‘आधुनिक युद्धात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर युद्ध आणि स्वायत्त प्रणालींचे महत्त्व वाढत आहे. तंत्रज्ञान हे मानवी निर्णयक्षमतेला पर्याय नाही. परिस्थितीचे आकलन करून दबावाखाली निर्णय घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे हे लष्करी नेतृत्वाचे महत्त्वाचे गुण आहेत.
डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती, कुलगुरू, डीआयएटी, पुणे
शाखानिहाय पदवी वितरण
पदवी – कॅडेट्स
बीए – ५८
बीएस्सी – ७७
बीएस्सी (संगणक विज्ञान) ९५
बीटेक १३४
एकूण ३६४





