पुणे | डाॅ. आंबेडकर वसतिगृहाचा होणार पुनर्विकास

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घोले रस्ता येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा डेंगूमुळे मृत्यू झाला. तसेच सुमारे ३० ते ४० विद्यार्थांना या आजाराची लागण झाल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकरणानंतर महापालिकेच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी वसतिगृहाची मोठया प्रमाणात दुरावस्था झाल्याचे समोर आल्यानंतर या वसतिगृहाचा पुनर्विकास केला जाणार आहे.
या बाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागास दिले आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेकडून या वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो.
त्यानंतरही येथे दारे, खिडक्या, इमारतीची अनेक भागात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे जुनी इमारात पाडून नवीन सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुलांना राहण्याचा खर्च देणार
वसतिगृह पुनर्विकासाबाबत लवकरच निर्णय घेऊन तातडीने हे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे मुलांची गैरसोय टाळण्यासाठी परिसरातच मनपा शाळा अथवा एखाद्या इमारतीमध्ये मुलांची निवास व्यवस्था केली जाणार आहे.
अथवा मुलांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक महिन्यासाठी राहण्याचे आणि जेवणाचा खर्च “डीबीटी’द्वारे देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तसेच कमीत कमी कालावधीत हे काम पूर्ण करून या वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचेही प्रशासनाचे नियोजन आहे.




