Dowry Death Pune | अजुन एक हुंडाबळी! मोटारसायकलसाठी पतीकडून छळ ; सहन न झाल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – लोणीकंद परिसरात हुंड्यासाठी होणार छळ सहन न झाल्याने एका २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत तरुणीचे नाव अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (रा. जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पती शिवाजी रमेशचंद्र मौर्या याच्याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी विजयबहादूर पतीराम मौर्या (२७, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजनीकुमारी हिचा विवाह एप्रिल २०२४ मध्ये शिवाजी रमेशचंद्र मौर्या याच्यासोबत झाला होता. लग्नावेळी अडीच लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने व संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा आरोपी पती शिवाजी मौर्या हा तुझ्या वडिलांनी अपाचे मोटारसायकल दिली नाही, या कारणावरून सतत पत्नी अंजनीकुमारीला शिवीगाळ व मारहाण करत होता.
दरम्यान, ११ जुलै २०२५ रोजी शिवाजीने पत्नीला उत्तर प्रदेशहून लोणीकंद परिसरात आणून ठेवले. त्यानंतर त्रास अधिक वाढला. अंजनीकुमारीने १६ सप्टेंबर रोजी सकाळी वडिलांना फोन करून माझा छळ मला सहन होत नाही, असे सांगितले. त्यानंतर तिच्या पतीने सासऱ्याला फोन करून मी अंजनीला मारून टाकणार, अशी धमकी दिली. या छळाला कंटाळून अंजनीकुमारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे सोपविण्यात आला आहे.


