पुणे जिल्हा | उगीचच श्रेय लाटू नका

राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – श्रेयासाठी भांडण करू नका लोकांचे काय प्रश्न आहेत, अडचणी काय आहेत ते सोडवणे बाजूला ठेवून उगीचच विरोधासाठी विरोध आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तालुक्यातील विकास कामांवर जिथे नाव द्यायचे तिथे द्या माझे नाव नसले तरी चालेल पण विकास कामे करा. मला काही तुमच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असा सबुरीचा सल्ला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना नाव न घेता दिला.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत राजगुरूनगर येथील दशक्रिया घाट शेड बांधणे व इतर विकास कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगल चांभारे, खेड तालुका ताष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, बाजार समिती अध्यक्ष कैलास लिंभोरे, संचालक अशोक राक्षे, राजगुरूनगर विकास मंचचे अध्यक्ष गणेश थिगळे, विनायक घुमटकर, सिद्धार्थ कांबळे, संतोष सांडभोर, मनीषा सांडभोर, मनीषा पवळे, आशा तांबे, सुभाष होले आदींसह नागरिक उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले, डोळ्यासमोर व्हिजन असले की विकास कामे मार्गी लागतात. राजगुरूनगर शहराचे वैभव वाढविण्यासाठी शहरात अनेक विकास कामे आणली आहेत. शहराच्या वैभवात भर घालणारी प्रशासकीय इमारत फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली की लवकरच प्रशासकीय इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. प्रास्ताविक वैभव घुमटकर यांनी, सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी तर युवक शहर अध्यक्ष सागर सातकर यांनी आभार मानले
प्रपंच बरोबर करणार असू तर…
मी मंजूर केलेल्या कामांवर शिवसेने (शिंदे गट)कडून पुन्हा तशीच कामे टाकली आहेत. काय उद्देश आहे माहिती नाही. पण आपण बरोबर प्रपंच करणार असू तर तो एकमेकाला विचारून केला पाहिजे, विकासाठी एकत्र यावे. राजगुरूनगरच्या विकास कोणी करत असेल तर मला अडचण आहे; मात्र वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळा निधी आणावा. तालुक्यात अनेक मोठी कामे त्यांनी करावी आणि तेथे त्यांच्या नावाचे काय बोर्ड लावायचे ते लावा माझा कुठेच बोर्ड लावू नका, असा टोला माजी खासदार आढळराव पाटील यांचे नाव न घेता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लगावला.
त्यासाठी भरिव निधी मिळवणार
राजगुरूनगर शहरात हुतात्मा राजगुरू यांचे एक देखणं स्मारक बनवणार आहोत शहरातील पोलीस स्टेशन सिद्धेश्वर मंदिराचा परिसर विकास,क्रीडा संकुल अत्याधुनिक पोहण्याचा तलाव वाडा रस्त्यावर संगम गार्डन तर धनश्री चौकापर्यंत गटार त्यावर पदपथ, शहरात सुंदर बाग, शहरातील ओढे नाले यांच्या कडेने संरक्षक भिंती, पे आणि पार्क वाहनतळ, शहरातील ओढे व नदी कडेची अतिक्रमणे हटविणे, राजगुरूनगर शहरातील सगळा परिसर स्वच्छ करणार, मारुती मंदिरजवळील ओढ्यावर वाडा रस्त्यावरचा पूल उंचबांधण्यात येणार शहरातील ओढ्यावर स्लॅब टाकणार, शहरातील पुरातन मारुती मंदीराचा जीर्णोद्धार कारण्यासह खेड (राजगुरूनगर) शहराला जोडणार्या सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव निधी मिळवणार आहे, असे आमदार मोहिते यांनी स्पष्ट केले.





