पुणे जिल्हा | खेडच्या दोर्या अनुभवी की तरुणाच्या हाती?

चाकण, {कल्पेश भोई} – आगामी खेड-आळंदी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जरी जाहिर झाल्या नसल्या तरी वातावरण तापू लागले आहे. त्यातच महायुती-महाविकास आघाडीत इच्छुकांचा भरणा अधिक आहे.
दरम्यान, खेड-आळंदीचे विद्यमान आमदार ही राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने ही जागा काका-पुतण्याच लढवणार का हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी या मतदारसंघाच्या दोर्या या पुन्हा अनुभावाकडे जाणार की तरुणाईच्या हाती जाणार हे निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे.
खेड आळंदी मतदारसंघात महायुतीतील अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील, अनिलबाबा राक्षे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे, पवार गटाकडून अमोल पवार,
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुधीर मुंगसे व लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान भाजपामधून प्रवेश केलेले अतुल देशमुख, भाजपाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील तर शिवसेना शिंदे गटाकडून अक्षय जाधव,
नितीन गोरे, भगवान पोखरकर हे इच्छुक असले तरी जागा महायुतीत अजित पवार गटालाच जाण्याची शक्यता असून महाविकास आघाडीत पवार गट, ठाकरे गट, काँग्रेसकडे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
तर राष्ट्रवदी-शिंदे गट-भाजपसह काँग्रेस-ठाकरे-पवार गटातील इच्छुक काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
सध्याचे मतदारसंघातील राजकीय वातावरण बघता आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पर्याय म्हणून पक्षातीलंच पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून विविध विकासकामांची भूमिपूजने केली.
त्यावेळी भाषणात बोलताना महायुतीत जागा आपल्या पक्षाला सुटली तर दिलीप मोहिते पाटील यांना साथ देण्याची हाक त्यांनी दिली.आणि नुकत्याच झालेल्या पक्षातंर्गत बैठकीत मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सुतोवाच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले. त्यामुळे खेडमध्ये पुन्हा मोहिते पाटील यांनाच उमेदवार मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
टीका न करता तरुणाईला जोडण्याचे काम
सध्या तालुक्यात तरुण चेहरे म्हणून अक्षय जाधवत सुधीर मुंगसे, बाबाजी काळे, नितीन गोरे या इच्छुकांनी वातावरण निर्माण केले आहे.
त्यात त्यांनी कुणावर टीका न करता तरुणाईला जोडण्याचे आणि तालुक्यातील जीवंत प्रश्न तरुणाई पुढे मांडण्यास सुरुवात केली आहे. विकासाचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे वरील इच्छुक उमेदवार यांची विधानसभेची तयारी जोरात असल्याचे चित्र दिसत आहे.
रोजगावर दिला भर
खेड तालुक्यातील तरुणाईच्या हाताला काम नाही, आमच्या जमिनी जाऊन आमचे मुले त्याच कंपनीत डबे घेऊन कामाला जात असतील तर हे चित्र कुठे तरी बदलविण्यासाठी आम्हाला आता तरुणाईला साथ देऊन युवा चेहरा आमदार करायचा आहे
त्यामुळे कोणावर टीकाटिप्पणी न करता फक्त तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा घेऊन तरुण इच्छुक निवडणुकीला सामोरे जात आहे. सर्वगुण संपन्न असतानाही फक्त तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाच्या आणि तरुणाईच्या उत्कर्षासाठी तरुणाईने विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग बाधला आहे.
मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न
महायुतीचे खेड-आळंदी विधानसभेत विद्यमान आमदार असल्याने वरिष्ठ पातळीवरूनही या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेत मोठी चुरस बघायला मिळणार आहे.
जर वरिष्ठ पातळीवरून आतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला तर खेड-आळंदी विधानसभेचे चित्र बदलल्या शिवाय राहणार नाही. मतदारसंघात महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.





