पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. तसेच मतदानासाठी वेळ लागल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मतदान खोलीत एकाच वेळी चार ते पाच मतदारांना प्रवेश देणे, त्याच बरोबरच एकाच इमारतीमधील मतदार खोल्यांची जास्त संख्या जास्त असल्यास केंद्रातील प्रत्येक खोलीमध्ये मतदारांची संख्या समान करणे, आदी उपयोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, दि. १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. तरी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नसल्यास मुदतीच्या आत मतदार नोंदणी करावी. मतमोजणीची ठिकाणे निश्चित पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. तर, चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी कामगार भवन येथे, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकूल येथे होणार आहे. तसेच जिल्ह्यातील मतदारसंघातील मतमोजणी तालुक्याच्या मुख्य ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिली.