नाद करायचा नाय.! अक्षय केळकर ठरला ‘बिग बॉस मराठी सिझन 4’चा महाविजेता…

मुंबई – 100 दिवस, 17 सदस्य आणि एक ट्रॉफी ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.
प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो.
बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य 100 दिवसं अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पाडला. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता मिळाला. या चौथ्या पर्वात ‘अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे’ हे स्पर्धक टॉप 5 स्पर्धक होते.
दरम्यान, यावेळी साताऱ्याचे किरण माने यांचा चांगलाच गाजावाजा झाला. तेच विजेते होतील अशी शक्यता ही होती. मात्र हा मान गेला तो ‘अक्षय केळकर’ याला. आणि तो यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. मात्र, ती ‘अक्षय केळकर’च्या हात आली असल्याचं पाहायला मिळालं.





