‘रेबीज’ रोगाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, अन्यथा होईल मृत्यू ! अशी घ्या काळजी….

पुणे – प्राण्यांपासून पसरणाऱ्या अनेक संसर्गजन्य रोगांबद्दल तुम्ही ऐकले असेलच. ‘रेबीज’ हा या धोकादायक आजारांपैकी एक आहे. रेबीज इतका धोकादायक आहे की तो रुग्णाचा जीवही घेऊ शकतो. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज आजाराने 14 वर्षीय मुलाचा (शहवाज) मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून कुत्र्याच्या मालकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. रेबीज हा आजार किती धोकादायक आहे आणि कुत्रा चावल्याने तो वेगाने पसरतो.
मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी रेबीजमुळे 18 ते 20 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. भारतात रेबीजची जवळपास 30 ते 60 टक्के अशी प्रकरणं आहेत, ज्यात 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांनी देखील या आजाराची गंभीर दखल घेत जर आपल्या मुलाला कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्यावर लवकर उपचार करणे महत्वाचे आहे.
रेबीजबद्दल बोलायचे झाले तर काही प्राण्यांच्या चाव्याव्दारे हा आजार होतो. जेव्हा संक्रमित प्राणी एखाद्या व्यक्तीला चावतात तेव्हा त्यांची लाळ त्या व्यक्तीच्या रक्तात मिसळते, ज्यामुळे रेबीजचे जंतू व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे आज आपण ‘रेबीज’ बद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत.
रेबीज रोग काय आहे?
रेबीज रोग संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग कुत्रा, माकडे आणि मांजरांच्या चाव्याव्दारे पसरतो आणि या संक्रमित प्राण्यांच्या लाळेमध्ये आढळणारे जंतू रक्तात मिसळतात आणि संसर्ग पसरतात. आजकाल पाळीव प्राण्यांना रेबीजची लस मिळू लागली असली, तरी भटक्या प्राण्यांना रेबीजची लस मिळत नाही आणि त्यामुळेच ते रेबीज आजाराचे मोठे वाहक बनतात.
रेबीजची लक्षणे काय आहेत…
रेबीजची लागण झालेला प्राणी माणसाला चावल्यास त्याची लक्षणे एक ते तीन महिन्यांत दिसू लागतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे दहा दिवसांनंतरही दिसू लागतात आणि काही प्रकरणांमध्ये आठ महिन्यांनंतरही सौम्य लक्षणे दिसतात. या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, अंगदुखी, मळमळ, थकवा, अस्वस्थता, निद्रानाश आणि सतत चक्कर येणे यांचा समावेश होतो. त्याची लक्षणे दुर्लक्षित राहिल्यास रेबीज इतका गंभीर होतो की अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो.
रेबीजवर इलाज काय….
रेबीजवर कोणताही इलाज नसला तरी काही लोक रेबीज झाल्यानंतरही बचावले आहेत. एखाद्या व्यक्तीला रेबीजग्रस्त कुत्रा चावला असेल तर त्याला वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे. जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असेल तर वेळोवेळी त्याचे लसीकरण करणे महत्त्वाचं आहे. जेणेकरुन हा प्राणी एखाद्याला ओरबाडला किंवा चावला तरी घरात राहणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या पाळीव प्राण्याचे वेळोवेळी लसीकरण होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.





