“भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, तुम्हाला…”; उबाठाच्या बड्या नेत्याचे विधान चर्चेत

Bhaskar Jadhav : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मैदान चांगलेच तापले आहे. यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना यांची महायुती निवडणुकीला सामोरे जात असून, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र मैदानात आहे. ठाकरे बंधूंची मनसे शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात एकत्र आहे.
त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ लाभली आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू महायुतीपुढे आव्हान उभे करतील अशी चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या युतीला मुंबईकर कसा प्रतिसाद देणार हे १६ जानेवारीला समजेल. तूर्तास या सगळ्यात उबाठा गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
मुंबई महापालिकाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे भाजप यांच्या युतीवर भास्कर जाधव यांनी “भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल,” असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. ते कल्याणमध्ये आयोजित सभेत बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु असतानाच भास्कर जाधव यांच्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
मुंबई महापालिकेत चुरशीची लढत होणार आहे. भाजप शिवसेना शिंदे युती, ठाकरे बंधू यांची मनसे उबाठा, राष्ट्रवादी स्वतंत्र आणि काँग्रेस वंचितला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार केला जात आहे. सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कालच ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेतून ठाकरे बंधूंनी आक्रमक शैलीत भाजपवर टीकेचे आसूड ओढले. आता दुसरी सभा आज १० जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.





