Jessica : १९९९ साली दिल्लीतील जेसिका लाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला होता. एका तरुणीने दारू देण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर गोळी झाडण्यात आली आणि ते प्रकरण देशातील सर्वात चर्चित हत्याकांडांपैकी एक ठरले. याच घटनेवर पुढे बॉलिवूडमध्ये ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपटही बनवण्यात आला. नेमकं काय घडलं होतं? २९ एप्रिल १९९९ रोजी दिल्लीच्या मेहरौली भागातील एका हाय-प्रोफाइल रेस्टॉरंटमध्ये खासगी पार्टी सुरू होती. मॉडेल जेसिका लाल बारमेड म्हणून काम करत होती. मध्यरात्रीनंतर बार बंद झाल्यावर हरियाणातील काँग्रेस नेते वेनोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा मित्रांसह तिथे पोहोचला. त्याने जेसिकाकडे दारू मागितली, मात्र तिने नकार दिला. संतापलेल्या मनु शर्माने आधी हवेत गोळी झाडली आणि नंतर थेट जेसिकाच्या डोक्यात गोळी झाडली. उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. न्यायालयीन लढा आणि जनआंदोलन या प्रकरणात १९९९ मध्ये आरोपपत्र दाखल झालं. मात्र २००१ मध्ये अनेक साक्षीदार फिरल्याने फेब्रुवारी २००६ मध्ये ट्रायल कोर्टाने पुराव्याअभावी मनु शर्माची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाने देशभर संतापाची लाट उसळली. माध्यमे, सामान्य जनता आणि सामाजिक संघटनांच्या दबावानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलं. डिसेंबर २००६ मध्ये उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निर्णय उलटवत मनु शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत २०११ मध्ये या घटनेवर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. राणी मुखर्जी आणि विद्या बालन यांच्या अभिनयामुळे चित्रपट गाजला आणि जेसिका लाल प्रकरण पुन्हा एकदा जनतेच्या स्मरणात आलं. आज मनु शर्मा कुठे आहे? जवळपास १५ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर २०२० मध्ये चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर मनु शर्माची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने आपलं नाव बदलून सिद्धार्थ शर्मा केलं. सध्या तो पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज अंतर्गत डिस्टिलरी व्यवसायात सक्रिय आहे. त्याचा Indri हा सिंगल माल्ट व्हिस्की ब्रँड आज भारतातील सर्वाधिक विकला जाणारा भारतीय सिंगल माल्ट ठरला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या ब्रँडमधून कंपनीने ८०० कोटींपेक्षा जास्त महसूल कमावल्याचं सांगितलं जातं.