75 लाखांची लाच घेतली; मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला ACBकडून अटक

Mumbai Bribe Crime : 75 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या के इस्ट वार्ड मधील पद निर्देशित अधिकारी मंदार तारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेतील अधिकारी लाच घेताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अंधेरीतील एका प्लॉटचे बांधकाम न तोडण्यासाठी अधिकाऱ्याकडे तक्रारदाराकडे 2 कोटीची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 7 ऑगस्ट 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तारी यांनी एका खासगी व्यक्तीस लाचेचा पहिला हप्ता म्हणून 75 लाख स्वीकारण्यास सांगून तेथून पळ काढला. याच लाचेचा गैरलाभ मिळवण्यासाठी तारी यांनी प्रयत्न केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
खासगी व्यक्तीकडून तारी यांनी 75 लाखाची रक्कम स्वीकारली होती. त्यावेळी 2 खासगी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा पासून तारी हे फरार होते.
दरम्यान अटकपूर्व जामीनासाठी तारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तारी हे आज पोलिसांसमक्ष हजर झाले. या प्रकरणात तारी यांना लाच लुचपत प्रकरणात अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.





