Anmol Bishnoi | Baba Siddique : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार ठरलेला गँगस्टर अनमोल बिश्नोई याला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने बुधवारी दिल्लीत अटक केली. अमेरिकेतून हद्दपार करून त्याला भारतात परत पाठवण्यात आले होते. अनमोल हा सध्या तुरुंगात असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून तो २०२२ पासून फरार होता. एनआयएच्या तपासानंतर त्याच्यावर मार्च २०२३ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अटक झालेला तो १९ वा आरोपी ठरत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा ‘विदेशी ऑपरेटर’ : एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० ते २०२३ दरम्यान भारतात झालेल्या विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये अनमोलने गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईला सक्रिय मदत केली. अमेरिकेत बसून तो भारतातील साथीदारांमार्फत टोळीची कामे चालवत होता. शूटर्सना आश्रय, आर्थिक मदत, तसेच परदेशातून भारतात खंडणी वसुली करण्यात त्याची मोठी भूमिका होती. चार्टर्ड विमानाने भारतात परत : अनमोलसह पंजाब पोलिसांना हव्या असलेल्या इतर दोन आरोपींना चार्टर्ड विमानाने अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले. अमेरिकन न्यायालयाने अनमोलचा आश्रयासाठीचा अर्ज फेटाळल्याने त्याला तातडीने भारतात हद्दपार करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.