नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वाद तसेच लष्कराबाबत देशात सुरू असलेल्या राजकारणावर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भाष्य केले आहे. लष्कराला राजकारणात ओढू नये असा सल्ला त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला आहे. लडाख सेक्टरमध्ये घुसखोरी झाल्याचे लष्करप्रमुखांनीच म्हटले होते असा दावा अलिकडेच राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या त्या विधानावर लष्करप्रमुखांनी त्यांना उत्तर दिले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये लष्करप्रमुख म्हणाले की, आम्ही चीनसोबत संवादाच्या मार्गावर पुढे गेलो आहोत. भारत आणि चीनमधील चर्चेद्वारे सर्व शंका दूर होतील. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही कॉर्प्स कमांडर्सना त्यांच्या पातळीवर यावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही. पूर्वी आम्हाला सीमेपलीकडून सांगण्यात यायचे की मित्रा, तुमचे आदेश दिल्लीहून येतील, मात्र आम्ही येथूनच गोळीबार सुरू करू. दरम्यान, उपेंद्र द्विवेदी हे सैन्यात महिलांचा समावेश करण्याचे समर्थक राहीले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा देवी कालीप्रमाणे महिलांना सैन्यात समाविष्ट करण्याबद्दल विधान केले. यावेळी त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाही उल्लेख केला. शस्त्रास्त्रांच्या विक्रीबाबत लष्करप्रमुख म्हणाले, आता परदेशातून आम्हाला शस्त्रे पाठवली जात आहेत. आता हे शक्य आहे कारण आता शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांना सहज परवाने मिळत आहेत आणि त्यांना सवलतीही मिळत आहेत. भारत नेहमीच प्रथम संवादाचा मार्ग शोधतो, परंतु जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आम्ही युद्धापासून मागे हटणार नाही.