“नखे कापून शहीद होऊ नका..” विरोधकांच्या हाती मुद्दा दिला म्हणणाऱ्या राहुल गांधींना भाजपचा टोला

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अनेक आरोप केले. माझी खासदारकी रद्द झाली तरी मी बोलतच राहणार,प्रश्न विचारात राहणार.. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही असं राहुल यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना आता भाजपच्यावतीने जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पाटणा येथे पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी माझी खासदारकी रद्द करून विरोधकांच्या हाती मुद्दा दिला आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या विधानाची रविशंकर प्रसाद यांनी खिल्ली उडवली.
“राज्यसभेत आणि लोकसभेत राहुल गांधींकडे वकिलांची फौज आहे. ही फौज सुरत न्यायालयात का आणली नाही? असा सवाल करतानाच राहुल गांधी कांगावा करत आहेत. नखे कापून शहीद होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असा टोला रविशंकर प्रसाद यांनी यावेळी लगावला.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, आज राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले की मी लंडनमध्ये काहीही बोललो नाही. भारतात लोकशाही कमकुवत होत असून युरोपीय देश लक्ष देत नसल्याचे राहुल गांधी यांनी लंडनमध्ये म्हटले होते. खोटे बोलणे हा राहुल गांधींचा स्वभाव बनला आहे.





