निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको; स्वामी गोविंदगिरींनी व्यक्त केले व्होट जिहादच्या मुद्द्यावर परखड मत

मुंबई : राजकीय लढतींना व्होट जिहाद म्हणणे चुकीचे ठरेल. कुणाला मतदान करावे, हे सांगण्यासाठी पूर्वी धार्मिक स्थळावरून पत्रक काढले जात होते. पण आता व्होट जिहादसारख्या घोषणा खुलेआम होत आहेत. हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहीजे. खरा हिंदू हा मानवतेचा पाईक असतो.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत सर्वांशी समान व्यवहार केला पाहीजे. तसेच अन्यायही कधीच सहन करू नये, असे मत श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्होट जिहादवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद आणि धर्मयुद्ध हे दोन शब्द वारंवार प्रचारात येत आहेत.
भाजपाकडून व्होट जिहादचा मुद्दा पुढे केला जात आहे. तसेच सज्जाद नोमानी यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडीओ भाजपाकडून दाखवला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी व्होट जिहादचा मुकाबला करण्यासाठी व्होट धर्म युद्धाने करू असे म्हटले होते.
महायुती सरकारविरोधात सज्जाद नोमानी यांनी व्होट जिहादचे आवाहन केले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. फक्त महाराष्ट्रच नाही तर केंद्रातील सरकारही अस्थिर करण्याबाबत नोमानी यांनी व्हिडीओत भाष्य केले असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.





