भारतात उत्पादन घेऊ नका; डोनाल्ड ट्रम्प यांची अॅपल कंपनीला स्पष्ट सूचना

दोहा – आयफोन तयार करणार्या अॅपल कंपनीने जास्तीत जास्त उत्पादन अमेरिकेत घेण्याची गरज आहे. या कंपनीने चीन किंवा भारतात उत्पादन घेऊ नये असे आपल्याला वाटते असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कतारमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की अॅपल ही अमेरिकन कंपनी आहे. आपण काल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांच्याबरोबर चर्चा केली.
अॅपल कंपनी अमेरिकेत 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याबद्दल ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले. मात्र ट्रम्प म्हणाले की अॅपल कंपनी भारतातील उत्पादन वाढविणार आहे असे ऐकले आहे. हे जर खरे असेल तर आपण अॅपल कंपनीच्या मताशी असहमत आहेत. भारत स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकेल. अॅपल कंपनीने भारतामध्ये उत्पादन घेण्याची काही एक गरज नाही असे आपल्याला वाटते.
ट्रम्प यांनी असे सांगितले की, भारतामध्ये आयातीवर सर्वात जास्त शुल्क लावले जाते. त्यामुळे भारतात वस्तू विकणे फारच अवघड झाले आहे. मात्र आता भारताबरोबर व्यापार करार करण्याचा अमेरिका प्रयत्न करत असून भारताने अमेरिकन वस्तूवर शून्य आयात शुल्क लावण्याची तयारी दर्शवली असल्याचा दावा ट्रंप यांनी केला. अॅपल अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने चीनमध्ये उत्पादन कमी करावे अशी आपली इच्छा होती. मात्र याचा अर्थ असा नाही की या कंपनीने भारतात उत्पादन करावे, असे ट्रम्प यांनी सांगितले.





