उठसूट कर सवलती मागू नका; रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उद्योग क्षेत्राला सूचना

नवी दिल्ली – देशातील आणि परदेशातील परिस्थितीचा विचार करून सरकार योग्य पातळीवर कर आकारणी करीत असते. मात्र उद्योग क्षेत्राने उठसूट कर कमी करण्याची मागणी करू नये, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, सरकारला भारतातील परिस्थिती लक्षात घेऊन गरिबांसाठी विविध योजना राबवाव्या लागतात. यासाठी निधीची गरज असते. त्यामुळे कर आकारणी करावी लागते. सरकारने एकदा कर कमी केला की पुन्हा कर कमी करण्याची मागणी होते. कारण तो मानवी स्वभाव आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारतात वाहतुकीचा खर्च जास्त असल्यामुळे वस्तूचे दर त्या प्रमाणात जास्त होतात. मात्र आता भारतातील वाहतुकीचा खर्च दोन वर्षात केवळ नऊ टक्के इतका होणार आहे. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल. सध्या भारतातील वाहतुकीचा खर्च म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट जगातील सर्वात जास्त म्हणजे 14 ते 16 टक्के इतका आहे. चीनमध्ये वाहतुकीचा खर्च केवळ आठ टक्के आहे. तर अमेरिका आणि युरोपियन देशातील वाहतुकीचा खर्च 12% आहे.





