Vehicle sales 2025: करसवलत आणि जीएसटी कपातीचा बुस्टर; सरलेल्या वर्षात वाहन विक्रीत 7.71 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला प्राप्ती कर ऊत्न्न मर्यादा वाढविली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी दरात कपात झाली. याचा फायदा वाहन उद्योगाला झाला आहे. अशा परिस्थितीत वितरकांनी ग्राहकांना विकलेली वाहन विक्री म्हणजे किरकोळ वाहन विक्री सरलेल्या वर्षात 7.71 टक्क्यांनी वाढून 2.81 कोटीवर गेली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर सासोसिएशन या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी किरकोळ वाहन विक्री 2.61 कोटी इतकी होती. सरलेल्या वर्षात प्रवासी वाहन विक्री 44.75 लाख युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी 40.89 लाख इतकी होती. या वाहन विक्रीत 9.7 टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रवासी वाहन विक्री बरोबरच सरलेल्या वर्षात दुचाकीची विक्री 7.24 टक्क्यांनी वाढून 2.02 कोटीवर गेली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1.79 कोटी इतकी होती. 2025 मध्ये तीन चाकी वाहनांची विक्री 7.21 टक्क्यांनी वाढून 13.09 लाख इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 12.21 लाख इतकी होती. सरलेल्या वर्षात व्यावसायिक वाहनांची विक्री 6.71 टक्क्यांनी वाढून 10.09 लाख इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 9.4 लाख इतकी होती.
याकडेवारीबद्दल समाधान व्यक्त करताना या संघटनेचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की, सरलेल्या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान स्थूल अर्थव्यवस्था बळकट होती. केंद्र सरकारने प्राप्ती कर ऊत्न्न मर्यादा वाढविली होती. मात्र तरीही ग्राहक सावध होते. त्यामुळे माफक प्रमाणात विक्री वाढली होती. मात्र 22 सप्टेंबरनंतर वाहन विक्रीत खर्या अर्थाने वाढ झाली. कारण बहुतांश वाहनावरील जीएसटी दरात जीएसटी परिषदेने कपात केली होती.
ते म्हणाले की, आता परंपरागत इंधनांबरोबरच इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची विक्रीही सर्वच वाहन क्षेत्रात वाढत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सरलेले वर्ष वाहानवतरकासाठी समाधानाचे गेले आहे. आगामी वर्षाबाबत बहुतांश वितरक आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले.




