Lara Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूनेकडून सिनेटसाठीची उमेदवारी मागे

Lara Trump | Donald Trump – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सून लारा ट्रम्प यांनी फ्लोरिडातून सिनेट सदस्यत्वासाठीची निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दिला आहे. रिपब्लिकन नेते मार्को रुबिओ यांच्या जागेवर लारा ट्रम्प या फ्लोरिडातील सिनेट सदस्या बनतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
बराच विचार, तिंतन आणि अनेकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनानंतर आपण अमेरिकेच्या सिनेट सदस्यत्वासाठीची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे लारा ट्रम्प यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. निवडणुकीऐवजी जानेवारी महिन्यात मोठी घोषणा करण्याचे वचन देखील त्यांनी चाहत्यांना दिले आहे.
लारा ट्रम्प या काही दिवसांपुर्वीच रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या सहअध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यामुळेच त्या सिनेटची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. लारा ली ट्रम्प या अमेरिकेतल्या राजकीय नेत्या आणि टिव्हीवरील निर्मात्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे तिसरे पुत्र एरिक ट्रम्प यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्थान देण्यात यावे, असा आग्रह टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांच्या आई माये मस्क यांनी धरला होता.





