Donald Trump : मैदानावरचं धाडस जीवावर बेतणार? इराणच्या महिला टीमसाठी ट्रम्प यांचं मोठं पाऊल; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिला खेळाडूंच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Donald Trump on Iran Women Football Team : इराणच्या महिला फुटबॉल संघाने एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान केलेल्या धाडसाने आता त्यांच्या जीवावर संकट ओढवले आहे. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंनी इराणचे राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर इराणमधील सरकारी माध्यमांनी या खेळाडूंना ‘युद्धाच्या काळातील गद्दार’ असे संबोधले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिला खेळाडूंच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
‘मानवी चूक करू नका’ – ट्रम्प यांचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना संबोधित केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, “मिस्टर प्राइम मिनिस्टर, या खेळाडूंना परत तेहरानला पाठवण्याची चूक करू नका. जर त्यांना परत पाठवले तर इस्लामिक राजवटीकडून त्यांची हत्या केली जाण्याची दाट शक्यता आहे. ही एक भयानक मानवीय चूक ठरेल. त्यांना तुमच्या देशात आश्रय द्या, आणि जर तुम्ही देऊ शकत नसाल, तर अमेरिका त्यांना आश्रय देण्यास तयार आहे.”
राष्ट्रगीत नाकारले अन् ‘गद्दार’ ठरले –
Update: Australia is all set to provide asylum to the Iranian Women Football players, confirms @POTUS .
He said on Truth Social that he has spoken to Australia’s prime minister and he is “on it”.#DonaldTrump https://t.co/Xtxa8iQLo5
— @TheQuotes (@thequotesnews) March 9, 2026
हा संपूर्ण वाद ऑस्ट्रेलियात आयोजित एका स्पर्धेदरम्यान सुरू झाला. दक्षिण कोरियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इराणी महिला संघाने राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. इराणमधील कट्टरतावादी सरकारने या कृतीला देशाचा मोठा अपमान मानले असून खेळाडूंना गंभीर परिणाम भोगण्याची चेतावणी देण्यात आली आहे. यामुळे या खेळाडूंना मायदेशी परतल्यावर जीवाला धोका निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारची भूमिका –
या संवेदनशील मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि व्यापार विभागाचे सहाय्यक मंत्री मॅट थिसलथवेट यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी सावध पवित्रा घेतला. गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून सरकार वैयक्तिक प्रकरणांवर सार्वजनिकरीत्या कोणतीही टिप्पणी करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंच्या मानवी हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी जोर धरत आहे.





