‘डोकेबाज’ पुणेकरांचा महापालिकेला ‘चकवा’; 10 रुपयांची पिशवी मिळवली 1 रुपयात

पुणे – पर्यावरणास घातक असलेल्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग ऐवजी पुणेकरांनी कापडी पिशव्या वापराव्यात या उद्देशाने महापालिकेकडून तुळशीबाग परिसरात कापडी पिशव्यांचे एटीएम बसविले आहे. या मशिनमध्ये 10 रुपयांचा कॉइन टाकल्यानंतर कापडी पिशवी आपोआप बाहेर येते.
मात्र, काही डोकेबाज पुणेकरांनी चक्क एक रुपयांचा कॉइन वापरून पिशव्या मिळविल्या असल्याचे समोर आले आहे. मशिनमधून पिशव्या व्यवस्थीत बाहेर येत नसल्याने महापालिकेकडून मशिनची तपासणी करण्यात आली. यावेळी, कॉइन बॉक्स उघडला असता त्यात चक्क 10 रुपयांऐवजी एक रुपयांची नाणी आढळून आली आहेत. ही बाब लक्षात येताच, महापालिकेने संबंधित कंपनीस तत्काळ मशिन दुरूस्त करून देण्याचे आदेश दिले आहेत.
पिशव्या हाताने ओढण्याचा प्रयत्न…
काही नागरिकांकडून कोणताही कॉइन न टाकता चक्क मशिनमध्ये ज्या भागातून पिशवी येथे त्या भागात आत मध्ये हात घालून पिशव्या काढण्याचे प्रयत्न काहींनी केल्याचे आणि त्यातून दोन ते तीन वेळा मशिनमध्ये पिशवी अडकून पडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, महापालिकेने मशिनच्या ठिकाणी सूचना लावण्याचा निर्णय घेतला असून असे प्रकार करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
प्रकार असा आला उघडकीस…
शहरात अनेक नागरिक साहित्य खरेदीसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात नंतर त्या कचऱ्यात टाकल्या जातात. या पिशव्या अविघटनशील असल्याने पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण होतात, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेस एका खासगी कंपनीने सीएसआर अंतर्गत कापडी पिशव्यांचे एटीएम बसविण्यास परवानगी दिली होती. या कंपनीने 8 मशिन महापालिकेस दिल्या. मात्र, त्यासाठी पिशव्या आवश्यक असल्याने एका बचतगटास हे काम दिले.
त्यानुसार, बचत गटाने “ना नफा ना तोटा’ तत्वावर या पिशव्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार, त्या मशिनमध्ये ठेवण्यात आल्या. मात्र, मशिन स्वयंचलित असल्याने त्याची जुळणी करून ते 10 रुपयांच्या कॉइन नंतरच पिशवी बाहेर येईल, असे सेट करणे आवश्यक असताना त्या पद्धतीने ते सेट झाले नाही. त्यातच, काही इरसाल पुणेकरांनी मशिनमध्ये 10 रुपयांच्या कॉईनऐवजी सहज म्हणून 1 रुपयांचे नाणे टाकले. तरीही मशीनमधून पिशवी बाहेर आली. त्यामुळे, मशिन बसविल्यानंतर पुढचा आठ दिवसांतच 1 रुपयांचा कॉइन टाकून 10 रुपये किमतीच्या तब्बल 70 ते 80 पिशव्या या मशीनमधून काढण्यात आल्याचे निदर्शनास आले.





