Facebook वर 3 वेळा लाईक बटण दाबल्याने येतो स्क्रीनशॉर्ट? जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागचं सत्य

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओ आणि दाव्यांपैकी काही खरे असतात, तर काही पूर्णपणे खोटे. अनेकदा लोक या व्हायरल गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात, ज्यामुळे फसवणुकीचे मेसेज आणि दावे मोठ्या प्रमाणात पसरतात. असाच एक दावा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काहींनी असं सांगितलंय की, फेसबुक पोस्टवर तीन वेळा लाईक बटण दाबलं तर आपोआप स्क्रीनशॉट घेतला जाईल. पण खरंच फेसबुककडे असं काही फीचर आहे का, की ही फक्त एक अफवा आहे?
सध्या फेसबुकवर अनेकजण “तीन वेळा लाईक करा आणि स्क्रीनशॉट घेतला जाईल” असं सांगणाऱ्या पोस्ट्स शेअर करत आहेत. हा दावा इतक्या आकर्षक पद्धतीने मांडला जातोय की, लोक उत्सुकतेपोटी तीनदा लाईक करून पाहतात आणि या पोस्ट्स री-शेअर करतात. काही वेळातच हा दावा व्हायरल ट्रेंड बनतो. याआधीही “लाईक केल्यावर रंग बदलेल” किंवा “कमेंट केल्यावर गिफ्ट मिळेल” अशा खोट्या दाव्यांनी सोशल मीडियावर गोंधळ निर्माण केला होता.
खरी वस्तुस्थिती काय?
फेसबुकने असं कोणतंही फीचर जाहीर केलेलं नाही. आम्ही फेसबुकच्या धोरणांचा अभ्यास केला असता असं आढळलं की, लाईक बटण दाबून स्क्रीनशॉट घेण्याचं कोणतंही फंक्शन अस्तित्वात नाही. स्क्रीनशॉट हा तुमच्या डिव्हाइसचा स्वतंत्र फीचर आहे, जो फोनच्या बटणांद्वारे किंवा सेटिंग्जद्वारे घेतला जातो. फेसबुकसारखी ॲप्स तुमच्या फोनच्या सिस्टम कमांड्सवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे तीन वेळा लाईक बटण दाबून स्क्रीनशॉट घेणं अशक्य आहे.
लोक अशा अफवांवर विश्वास का ठेवतात?
सोशल मीडियावर माहिती तपासण्याआधी ट्रेंड फॉलो करण्याची सवय अनेकांना आहे. तंत्रज्ञानाविषयी अपुरी माहिती, नवीन फीचरबद्दलची उत्सुकता आणि सतत दिसणाऱ्या पोस्ट्समुळे लोक अशा दाव्यांवर सहज विश्वास ठेवतात. काहीवेळा अशा पोस्ट्स मजा किंवा ट्रोलिंगसाठीही केल्या जातात.
फेसबुकवर तीन वेळा लाईक केल्याने स्क्रीनशॉट घेतला जाण्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा पोस्ट्स कधी कधी फसवणुकीसाठीही पसरवल्या जाऊ शकतात. त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री करा आणि मगच पुढे शेअर करा किंवा फॉलो करा.





