‘नॅशनल मेडिकल कमिशन’ विधेयकाविरोधात डॉक्टरांचा देशव्यापी संप

नवी दिल्ली : नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 24 तास कामबंद आंदोलन सुरू राहणार असले तरी अत्यावश्यक सुविधा चालु ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या एकदिवसीय संपात मुंबईतील 10 ते 15 हजार, राज्यातील 70 ते 80 हजार तर देशातील 3 ते 4 लाख डॉक्टर सहभागी होणार आहेत. नुकतेच नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार मॉडर्न मेडिसीनशी संलग्न असणाऱ्या औषधं देण्याचा परवाना मिळणार आहे. एवढेच नाही तर फार्मासिस्ट, नर्स फिजीओथेरेपीस्टदेखील रुग्णांना औषधे देवू शकणार आहेत. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावर डॉक्टरांनी नाराजी व्यक्त करत एक दिवसीय संपाचे हत्यार उपसले आहे.




