Satara News : डॉक्टर ‘संपदा’चे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं? तपासात धक्कादायक माहिती समोर

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली आहे. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री फलटणमधील ‘हॉटेल मधूदीप’च्या खोलीत त्यांनी जीवन संपवले. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार, त्यांचा मृत्यू गळफासामुळे झाला असून, शरीरावर कोणतीही जखम किंवा व्रण आढळले नाहीत.
मात्र, डॉ. मुंडे यांच्या डाव्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमधील आरोप आणि पोलिस तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती या प्रकरणाला नवे वळण देत आहे. पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने आणि डॉ. मुंडे यांच्या घर मालक प्रशांत बनकर यांच्यावर शारीरिक व मानसिक छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही फरार असल्याने पोलिसांच्या दोन पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच डॉक्टर महिलेचे प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांच्याशी अनेकदा फोन कॉल झाल्याचंही समोर आलं आहे.
पोलीस तपासात काय समोर आलं?
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या आठ महिन्यांपासून प्रशांत बनकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. बनकर यांच्या आई त्यांना जेवणाचा डबा पुरवत असत. जानेवारी २०२५ पासून बनकर आणि डॉ. मुंडे यांच्यात १५८ पेक्षा अधिक फोन कॉल्स झाल्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्डमधून उघड झाले आहे.
विशेषतः, आत्महत्येपूर्वी २३ ऑक्टोबरला पहाटे १.३० वाजता डॉ. मुंडे यांनी हॉटेलमध्ये चेक-इन केले, तेव्हा त्यांचा बनकर यांच्याशी शेवटचा कॉल झाला. हॉटेल खोली दोन दिवसांसाठी बुक केली होती आणि त्यावेळी डॉ. मुंडे एकट्याच होत्या. PSI गोपाल बदने यांच्याशीही त्यांचे अनेक कॉल्स झाले असल्याचे समोर आले आहे.
डॉ. मुंडे यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल्स डिलिट झाल्याने सायबर तज्ज्ञांकडून डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत. डॉ. मुंडे या दोन महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होत्या आणि वरिष्ठांना तक्रार केली होती, पण कारवाई झाली नाही.





