Alandi : इंद्रायणीत गणेशमूर्तींचे विसर्जन करू नका
Alandi : भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेच्या वतीने शहरात सहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे आणि कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आळंदी : पवित्र तीर्थक्षेत्र आळंदीची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपणे आणि नदीचे प्रदूषण रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीपात्रात गणेशमूर्तींचे थेट विसर्जन करू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. सन 2017-18 पासून नदीपात्रात गणेशमूर्तींचे थेट विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली असून, यंदाही या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेच्या वतीने शहरात सहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे आणि कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीकडे जाणार्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले असून, नदीपात्रात मूर्ती विसर्जित होणार नाहीत यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. नदीकडे येणार्या गणेशमूर्ती नदीत विसर्जित न करता संबंधित संकलन केंद्रांवर जमा करून त्यानंतर कृत्रिम हौदात विसर्जित केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.
मूर्ती संकलन केंद्रांवर प्रकाशयोजनेसाठी एलईडी दिवे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर टेबल, खुर्च्या आणि भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणेची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘स्वच्छ भारत’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत गणेशोत्सव काळात शहरात व्यापक जनजागृती व प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. भाविक व नागरिकांनी मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत नदीकाठासह शहर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, संकलित कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे.
दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर एकूण 68 गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. भाविकांकडून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
सहा ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था
गणेशमूर्ती संकलनासाठी इंद्रायणी घाट (वैतागेश्वर मंदिराजवळ-हवेली बाजू), इंद्रायणी नदी घाट (झाडीबाजार-खेड बाजू), वाय जंक्शन (हवेली बाजू), नगरपालिका चौक (खेड बाजू), केंद्रे महाराज मठ परिसर (खेड बाजू) आणि सिद्धबेट परिसर (खेड बाजू) या सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सहा मूर्ती संकलन केंद्रांवर नगरपरिषदेच्या वतीने 11 अधिकारी आणि 63 कर्मचारी, असे एकूण 74 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि मूर्ती संकलनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
पावित्र्य जपणे प्रत्येकाचे कर्तव्य
इंद्रायणी मातेचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक भाविक आणि नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे आळंदीकर नागरिक, गणेश मंडळे तसेच बाहेरून येणार्या भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींचे इंद्रायणी नदीत विसर्जन न करता नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवरच मूर्ती जमा कराव्यात. प्रशासनाला सहकार्य करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांच्या वतीने करण्यात आले आहे.





