सुरेश धसांची नार्को टेस्ट करा; खोक्याशी धसांचे जवळचे संबंध, कोणी केली मागणी?

बीड : बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. एकेक प्रकरण बाहेर येताना पाहायला मिळत आहे. असं असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी करण्यात आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याशी सुरेश धस यांचे जवळचे संबंध असल्याचे अधोरेखित करत धस यांच्या आशीर्वादानेच खोक्या बेकायदेशीर कामे करत होता, असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
काय म्हणाले नवनाथ वाघमारे?
आमदार सुरेश धस आणि सतीश उर्फ खोक्याचे जवळचे संबंध आहेत. सुरेश धस यांच्या आशीर्वादानेचे खोक्याकडून हरण, काळवीट आणि मोराची तस्करी सुरू होती. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी केली जावी, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. याबरोबरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धसांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे.
तसेच सुरेश धस आणि खोक्या भोसले याची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरेश धस यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आपले कारनामे खोक्याने बाहेर काढू नये यासाठी सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. मात्र धसांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्यावा, अशी मागणी नवनाथ वाघमारे करत आहेत.
सुरेश धसांनी ओढले वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे
मागील आठवड्यात खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या ग्लास हाऊसवर वन विभागाने कारवाई केली. यानंतर काही अज्ञातांनी हा परिसर पेटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. सदरील घटना घडल्यानंतर सुरेश धस यांनी भोसले कुटुंबाची भेट घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. वनविभागाने हे घर कोणत्या नियमाने पाडले त्याची उत्तर मिळणे गरजेचे आहे असे सुरेश धस यांनी म्हटले होते.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत.





