Dnyaneshwari Yadav : मासिक पाळीच्या तीव्र वेदना अन् तरीही देशासाठी पदक! ज्ञानेश्वरी यादवने ग्लासगोत रचला इतिहास
महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने (Dnyaneshwari Yadav) चमकदार कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली. या पदकासह भारताची एकूण पदकसंख्या १० वर पोहोचली असून, यामध्ये २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.

Dnyaneshwari Yadav : ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली.
महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने (Dnyaneshwari Yadav) चमकदार कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली. या पदकासह भारताची एकूण पदकसंख्या १० वर पोहोचली असून, यामध्ये २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
मासिक पाळीचा पहिला दिवस अन् वेदनांवर मात
पदक जिंकल्यानंतर ‘पीटीआय’शी बोलताना ज्ञानेश्वरीने (Dnyaneshwari Yadav) एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले की, “स्पर्धेच्या दिवशी माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. तीव्र वेदना होत असल्यामुळे माझे शरीर मला साथ देईल की नाही, आणि मी सर्वोत्तम कामगिरी करू शकेन की नाही, याबाबत मला शंका होती. मात्र, मी सर्व वेदना सहन करत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आणि देशासाठी पदक जिंकण्यात यशस्वी ठरले.”
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari Yadav) पुढे म्हणाली, “कॉमनवेल्थ गेम्समधील माझा हा पहिलाच सहभाग होता. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते, परंतु स्पर्धा अत्यंत कठीण होती. सुवर्ण चुकले तरी रौप्यपदक जिंकल्याचा मला प्रचंड आनंद आहे.”
अशी राहिली ज्ञानेश्वरीची कामगिरी
महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात ज्ञानेश्वरीने ‘स्नॅच’ प्रकारात ८८ किलोग्रॅम आणि ‘क्लीन अँड जर्क’ प्रकारात १११ किलोग्रॅम असे एकूण १९९ किलोग्रॅम वजन उचलून रौप्यपदक आपल्या नावावर केले. विजय मिळवल्यानंतर ज्ञानेश्वरीने (Dnyaneshwari Yadav) भारतीय तिरंग्यासमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली.
वडिलांच्या कष्टाचे फळ
ज्ञानेश्वरीचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिच्या या ऐतिहासिक यशामागे तिच्या वडिलांचे मोठे योगदान आणि प्रचंड कष्ट आहेत. वडिलांच्या प्रेरणेमुळेच तिने सर्व अडचणींवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानाने उंच केली आहे.






