लग्नसराईत डीजेला फाटा; सनई, ताशा, संबळ, हलगी वाजंत्रींना अच्छे दिन…

चिंबळी – तुळशी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई तसेच यात्रांचा हंगाम धूमधडाक्यात सुरू झाला आहे. पोलीस प्रशासनाने डिजीटल साउंड सिस्टीमवर निर्बंध घातल्यामुळे पारंपारिक वाजंत्री मंडळींना लग्नसराईच्या काळात मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
लग्न समारंभात पूर्वीप्रमाणेच आता सनई, ताशा, संबळ, हलगी, डफ तसेच बँड अशा पारंपरिक वाद्याचा सूर कानी ऐकू येत आहे. गेल्या काही वर्षांत पारंपारिक वाजंत्रीची मागणी वाढत असल्याचा नवा ट्रेंड दिसत आहे.
पारंपारिक वाजंत्री मंडळींना वर्षभरात केवळ लग्न सराईचा हंगाम मिळतो. यामध्येच ते कमाई करू शकतात. अलिकडच्या काळात वाजंत्री कलाकारांना चांगले पैसे मिळत आहेत. एका दिवसाची लग्नाची सुपारी पंधरा हजार रुपयांपर्यंत घेतली जात आहे. मागणी वाढल्याने वाजंत्री कलाकारांनी आपल्या चमूचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
वाजंत्री कलाकारांच्या एका ताफ्यात सात ते आठ वाजंत्री कलाकार असतात. ताफ्यातील सर्व कलाकारांना एकसारखा पोशाख, स्वतंत्र वाहनांची व्यवस्था असे बदल करून अधिक काल सुसंगत होण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतो.
साहजिकच लग्न समारंभामध्ये वाजंत्री मंडळींचे आकर्षक वाढते आहे. ध्वनी प्रदुषणामुळे लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात, ध्वनी प्रदुषणामुळे ह्रदयावर ताण येणे, ह्रदयविकाराचा झटका येणे यांसारखे त्रास होऊ शकतात , तसेच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. ह्रदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बद्दल होतो. सतत मोठ्या आवाजाजवळ राहिल्यास कान बधिर होतात. त्यामुळेच आता लोक पारंपारिक वाद्यांकडे वळत असल्याचे दिसत आहे.





