DJ Ban Pune: आंदोलन रद्द झाल्याचा तो व्हिडीओ बनावट? डीजेविरोधातील एल्गार मोडून काढण्याचा कुणाचा प्रयत्न?
DJ Ban Pune: डीजे, लेझर आणि अवास्तव ध्वनिप्रदूषणाविरोधात पुणेकरांचे उत्स्फूर्त आंदोलन; भ्रम पसरवणाऱ्या व्हिडीओवर नागरिकांचा संताप.

DJ Ban Pune – रविवारी डीजेसोबत लाउडस्पीकर, लेझर आणि अन्य ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात पुणेकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ढोल- ताशा आणि लेझीमसारख्या पारंपरिक वाद्यांवरही आवाजाची मर्यादा असावी, अशीही मागणी या वेळी आंदोलकांनी केली. तत्पूर्वी शनिवारी संध्याकाळी काही गणेशोत्सव मंडळांनी एक व्हिडीओ प्रसारित करून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नागरिक,
पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी चर्चा केली असून, गणेशोत्सवात प्रेशर मीड, प्लाझ्मा साउंड आणि लेझर लाइट्स यांना बंदी असणार असल्याचे त्यामध्ये सांगितले. त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाला येऊ नये, आंदोलन रद्द झाले आहे आणि पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे या व्हिडीओत सांगण्यात आले. मात्र, दोन्ही आंदोलने कोणत्याही संस्था किंवा संघटनेने पुकारली नव्हती.
त्यामुळे आंदोलनाच्या परवागनीसाठी कोणत्याही संघटनेने विचारणा केली नसल्याने आंदोलनाला परवानगी देणे किंवा नाकारण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. डीजेविरोधातील चळवळीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता काही जणांकडून आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलक नागरिकांनी केला. डीजे बंदी ही मुख्य मागणी असताना आंदोलन होणार नसल्याचे काही जणांनी परस्पर जाहीर केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पुणेकर काय म्हणतात?
ध्वनिप्रदूषण अवास्तव पद्धतीने वाढले आहे. ते थांबविण्यात पोलीस, महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. कुठलाही सण किंवा कार्यक्रम ध्वनिप्रदूषणाशिवाय साजरा झाला पाहिजे. ढोल- ताशांना आमचा विरोध नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट मर्यादेत असली पाहिजे.
– श्रीधर घाणेकर, नवी पेठ
आमचा कुठल्याही उत्सवाला किंवा गणेशोत्सवाला विरोध नाही. आम्ही हिंदू आहोत आणि सण साजरे केलेच पाहिजेत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने उत्सव सुरू केला, त्या स्वरूपाकडे पुन्हा वळले पाहिजे. फक्त डीजे वाजविणे म्हणजे गणपती उत्सव आहे, ही चुकीची संकल्पना आहे.
– कौस्तुभ ठकार, नारायण पेठ
रात्री उशिरापर्यंत डीजे लावल्याने होणाऱ्या त्रासाला आमचा विरोध आहे. हा प्रश्न गणेशोत्सवापुरता नाही. विविध जयंती, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांतील डीजेचाही नागरिकांना त्रास होतो. हा त्रास बंद झालाच पाहिजे. आम्ही कोणत्याही राजकीय संबंधातून नाही, सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहोत.
– निकिता भिडे, टिळक रोड
सणांवेळी एवढ्या मोठ्या आवाजात डीजे, वाद्ये वाजवली जातात, की घरातील आजारी व्यक्तींचे, लहान मुलांचे, सामान्यांचे किती हाल होतात, याची कल्पना करवत नाही. डीजेचा आवाज मर्यादेत ठेवल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात ती मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे डीजे पूर्णपणे बंद असावा, अशी माझी भूमिका आहे.
– सुशील शाह, सदाशिव पेठ






