Diwali 2022 : छत्तीसगडच्या ‘या’ गावात आठवडाभर आधी साजरी होते दिवाळी? जाणून घ्या यामागचं कारण …

Chhattisgarh : आज वसुबारसने दिवाळीची सुरुवात झाली. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे आगमन होताना बाजारपेठांमध्ये एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की आपल्या देशात एक असे शहर आहे जिथे दिवाळीचा सण आठवडाभर आधी साजरा केला जातो. एवढेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल (Diwali is celebrated a week early in this village of Chhattisgarh) की केवळ दिवाळीच नाही तर छत्तीसगडमधील ‘या’ गावात प्रत्येक सण एक आठवडा आधी साजरा केला जातो.
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की या विचित्र परंपरेमागचे कारण काय? चला तर मग आज या परंपरेबद्दल जाणून घेऊया. वास्तविक, ही परंपरा छत्तीसगडमधील सेमरा गावात साजरी केली जाते. याशिवाय, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला अशी आगळीवेगळी दिवाळी पाहायला मिळणार नाही.
दिवाळी हा आनंदाचा सण. भगवान रामाने लंकेवर विजय मिळवल्यानंतर साजरा केला जातो. यंदाही 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या दिवाळीबद्दल सांगणार आहोत, जिथे दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी केली जाते. या गावात 18 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि 19 तारखेला गोवर्धन पूजनाने दिवाळीची आधीच सुरुवात झाली आहे.
छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. जिल्ह्यातील सेमरा गावात दिवाळीच्या आठवडाभर आधी सण साजरा करण्याची परंपरा गेल्या 5 दशकांपासून सुरू आहे. केवळ दिवाळीच नाही तर होळी आणि हरेली पोळा हे सणही आठवडाभर आधी साजरे केले जातात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील प्रत्येक अंगणात सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे. लोकांनी संपूर्ण गाव मातीच्या दिव्यांनी उजळून टाकले आहे. त्याचबरोबर लहान मुले व मोठ्यांनी फटाक्यांच्या आवाजाने आसमंत दणाणला सोडला आहे.
परंपरेमागील रहस्य
या प्रश्नाला उत्तर देताना गावातील एका व्यक्तीने सांगितले की, आमच्या गावात एक सिदार देव आहे, ज्यांनी गावाला मोठ्या संकटातून मुक्त केले. यानंतर गावातील एका पुजार्याला स्वप्न पडले, त्यानुसार सिदार देव यांनी गावात कधीही संकट येणार नाही असे आश्वासन दिले आणि सांगितले की यासाठी तुम्हाला प्रथम माझी पूजा करावी लागेल. यामुळेच दरवर्षी हा सण सात दिवस अगोदर साजरा केला जातो.





