Diwali Health Tips : दिवाळीचा फराळ खाल्ला, जागरणही केले..; आता शरीराला द्या रिचार्ज, आळस झटकण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
सणाच्या दिवसांत बिघडलेले खाण्यापिण्याचे वेळापत्रक, गोडधोड पदार्थांचा अतिरेक, उशिरापर्यंत जागरण आणि धावपळ याचा परिणाम शरीरावर जाणवू शकतो.

Diwali Health Tips : दिवाळीचा जल्लोष संपला, फराळाचे डबे रिकामे झाले आणि पाहुण्यांची वर्दळही कमी झाली; पण आता शरीर मात्र थकल्यासारखे वाटत आहे का? सतत आळस येणे, कामात लक्ष न लागणे, अंगात उत्साह नसणे आणि सकाळी उठण्याचा कंटाळा येणे, असा अनुभव अनेकांना दिवाळीनंतर येतो. सणाच्या दिवसांत बिघडलेले खाण्यापिण्याचे वेळापत्रक, गोडधोड पदार्थांचा अतिरेक, उशिरापर्यंत जागरण आणि धावपळ याचा परिणाम शरीरावर जाणवू शकतो.
अशावेळी लगेच कठीण व्यायाम सुरू करण्याऐवजी शरीराला हळूहळू पुन्हा सक्रिय करणे महत्त्वाचे आहे. काही सोपे व्यायाम, श्वसनाचे सराव आणि ध्यानधारणा यामुळे दिनचर्या सुधारण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या हे चार सोपे उपाय!
१. रोजच्या चालण्याने करा दिवसाची सुरुवात
शरीराला पुन्हा सक्रिय करण्यासाठी चालणे हा सर्वांत सोपा आणि सहज करता येणारा व्यायाम आहे. सकाळी किंवा संध्याकाळी १५ ते २० मिनिटे चालण्यापासून सुरुवात करा. शरीराची सवय आणि क्षमता वाढेल तशी वेळ व अंतर वाढवा. हळूहळू दररोज ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक चालण्याचे लक्ष्य ठेवता येईल. नियमित चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य, रक्ताभिसरण आणि शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यास मदत होते.
२. भस्त्रिका प्राणायामाने श्वसनाचा सराव करा
दिवाळीच्या धावपळीनंतर मन आणि शरीराला शांत करण्यासाठी प्राणायामाचा आधार घेता येतो. भस्त्रिका प्राणायामात श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे ही क्रिया लयबद्ध पद्धतीने केली जाते. शांत ठिकाणी पाठ ताठ ठेवून बसा आणि सुरुवातीला प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली काही श्वसनचक्रांचा सराव करा.
मात्र हा प्राणायाम प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. उच्च रक्तदाब, हृदयविकार, चक्कर येण्याचा त्रास किंवा इतर आरोग्यसमस्या असल्यास डॉक्टर किंवा योगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वेगवान श्वसन करू नका.
३. सिद्धा वॉकचा घ्या अनुभव; शरीराचा समतोल राखण्यास मदत
व्यायामात काहीतरी वेगळे करून पाहायचे असेल तर सिद्धा वॉकचा सराव करू शकता. यामध्ये जमिनीवर इंग्रजी आठ (8) या आकड्याच्या आकारात चालले जाते. एका दिशेने आणि नंतर विरुद्ध दिशेने चालण्याचा सराव केला जातो. सुरुवातीला ५ ते १० मिनिटे पुरेशी आहेत.
४. दिव्याच्या ज्योतीकडे पाहून करा ध्यानधारणा
सणाच्या धावपळीत मानसिक शांततेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशावेळी दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून ध्यानधारणा करण्याचा सराव करता येतो. सुरक्षित जागी दिवा लावा आणि आरामात बसा. काही क्षण ज्योतीकडे पाहिल्यानंतर डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. सुरुवातीला ५ मिनिटे आणि नंतर हळूहळू १० मिनिटांपर्यंत हा सराव वाढवू शकता. यामुळे मन शांत ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होऊ शकते.
दिवाळीनंतर या सवयीही ठेवा लक्षात!
– आहारावर नियंत्रण ठेवा : फराळ आणि गोड पदार्थांचे प्रमाण कमी करून फळे, भाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
– पुरेसे पाणी प्या : दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या.
– झोप पूर्ण करा : दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
– व्यायाम हळूहळू वाढवा : सुरुवातीलाच अतिश्रम न करता शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करा.
– स्क्रीन टाइम कमी करा : झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी केल्यास झोपेच्या दिनचर्येला मदत होऊ शकते.







