मशालींच्या प्रकाशात सज्जनगडावर दिवाळी पहाट

सातारा – किल्ले सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट हजारो मशाली प्रज्वलित करून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले सज्जनगड नव्हे तर परळी पंचक्रोशी दुमदुमून निघाली होती. यावेळी गडावरील दोन्ही महाद्वार, बुरुजावर विद्युत रोषणाई करण्यात आली. ठिकठिकाणी फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. समाधी मंदिर, श्रीधरकुटी येथे फुलांची आरास करण्यात आली होती. पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता.
सज्जनगड दुर्गसंवर्धन समूहाच्यावतीने मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता भातखळे (वाहनतळ) येथून फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरात ढोल ताशांचा निनाद सुरू होता. पायरी मार्गावर फुलांचा आणि रांगोळीचा सडा करण्यात आला होता. पालखीच्या पाठीमागे शेकडो मावळे मशाली घेऊन पायरी मार्गाने गडावर पोहोचले. गाईमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार मार्गे पालखी अंगलाई मंदिराकडे आली. यावेळी पारंपरिक आगीचे मर्दानी खेळ करण्यात आले.
अंगलाई मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी गडाच्या तटावरून धाब्याच्या मारुतीकडे नेण्यात आली. यावेळी संपूर्ण तट मशालीने प्रज्वलित झाला होता. यानंतर मुख्य समाधी मंदिरामार्गे पेठेतील मारुती मंदिर, श्रीधर कुटी मार्गे आंगलाई मंदिराकडे पालखी आणण्यात आली. पारंपरिक आगीचे खेळ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी समाधी मंदिराकडे प्रस्थान झाली. यावेळी उपस्थित शिवभक्तांचा शिवरायांच्या जयजयकार सुरूच होता. रामदास स्वामी संस्थानच्या प्रांगणात साहसी खेळ सादर करण्यात आले. ध्येयमंत्र म्हणण्यात आला. यावेळी गडावरील संपूर्ण भारावलेले वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.





