Diwali 2026: आगीच्या घटनेनंतर ‘या’ ठिकाणी फटाक्यांच्या वापरावर बंदी; नियम मोडल्यास कारवाई
Diwali 2026 : रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध

Diwali 2026: लक्ष्मीपूजनच्या दिवशी मोठ्या उत्साहात फटाके फोडण्यात आले. मात्र राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर ठाणे, मुंबई आणि वसई-विरार परिसरात आगीच्या अनेक घटना घडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून संपूर्ण जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतही रॉकेट फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून यासंदर्भात लवकरच अधिकृत परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक तसेच खासगी जागा, इमारतीची गच्ची, बाल्कनी आणि सर्व रहिवासी भागांमध्ये हे निर्बंध लागू राहतील.
रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांचे जळते अवशेष निवासी इमारती, खिडक्या आणि ज्वलनशील वस्तूंवर पडल्याने आग लागण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार, संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध असेल.
8 जानेवारीपर्यंत बंदी
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला हा आदेश साधारण तीन महिने म्हणजेच 9 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 8 जानेवारी 2027 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली आहे.
तसेच गृहनिर्माण संस्थांनीही आपल्या सभासदांना या आदेशाची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा:





