Aryaveer Sehwag Century : बाप तसा बेटा! वीरेंद्र सेहवागच्या लेकाने ठोकले शानदार शतक; युएईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी
Aryaveer Sehwag Century : भारत आणि युएई यांच्यात १९ वर्षांखालील आशिया कपचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा १९ वर्षांखालील सलामीवीर आर्यवीर सेहवागने शानदार शतक झळकावले. त्याने १३१ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

Aryaveer Sehwag Smashes Maiden Century India U19 vs UAE U19 Asia Cup 2026 : अंडर-१९ आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघ युएईविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात मैदानात उतरला आहे. युएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; मात्र भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. कर्णधार लक्ष्य राजचंदानी आणि आर्यवीर सेहवाग या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. लक्ष्य बाद झाल्यानंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने मैदानावर हुकमत गाजवत १३१ चेंडूंत दिमाखदार शतक झळकावले.
१३ चौकार अन् २ षटकार; आर्यवीरचे स्पर्धेतील पहिले शतक
पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात अर्जुन राजपूतने वादळी शतक झळकावले होते, परंतु आर्यवीर अवघ्या २२ धावांवर स्वस्तात बाद झाला होता. युएईविरुद्ध मात्र त्याने कोणतीही चूक न करता चौफेर फटकेबाजी केली. आपल्या शतकी खेळीदरम्यान त्याने १३ आकर्षक चौकार आणि २ गगनचुंबी षटकार लगावले. या स्पर्धेतील आर्यवीरचे हे पहिलेच शतक आहे. यापूर्वी नेपाळविरुद्ध त्याने नाबाद ७० धावांची उपयुक्त खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या अपयशानंतर त्याने घेतलेली ही भरारी कौतुकास्पद ठरली.
व्ही. के. विनीतसोबत शतकी भागीदारी; धावसंख्या २०० पार
Leading the charge at the top of the order 👊
An impressive 𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗 by Aaryavir Sehwag 💯
Updates ▶️ https://t.co/M0EJVCkM56
#MensU19AsiaCup https://t.co/lntDRlo5F2
— BCCI (@BCCI) November 10, 2026
सलामीवीर लक्ष्य बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या व्ही. के. विनीतसोबत आर्यवीरने दुसऱ्या विकेटसाठी दमदार शतकी भागीदारी रचली. या दोघांनी आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा सुंदर मेळ घालत भारतीय डावाला गती दिली. आर्यवीरने अत्यंत मोकळेपणाने मोठे फटके खेळत अवघ्या ३८ षटकांत भारताचा स्कोर १ बाद २०३ धावांपर्यंत नेला. दुसऱ्या टोकाला विनीतनेही त्याला तोडीस तोड साथ देत उत्कृष्ट फलंदाजी केली.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला विजय अनिवार्य
A Sehwag special in the making! 🔥💯
Aaryavir Sehwag lights up the stage with a sensational century! 👏
Watch #INDvUAE in #AsiaCupU19 LIVE NOW on #SonyLIV & #SonySportsNetwork https://t.co/oFD6vYANi5
— Sony LIV (@SonyLIV) November 10, 2026
ग्रुप-ए मधून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने पहिल्या लढतीत नेपाळला १२८ धावांवर रोखून बिनबाद सहज विजय मिळवला होता; परंतु दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने समीकरण किचकट झाले. उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी भारताला युएईविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. आर्यवीरच्या या शतकामुळे भारताने मोठी आघाडी घेतली.





