22 दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर; दावा दाखल करण्यांपूर्वी 20 महिने राहत होते विभक्त

पुणे : वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या दांपत्याचा घटस्फोट 22 दिवसात मंजुर झाला आहे. 31 मे रोजी दाखल केलेला दावा 21 जून रोजी निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.ए. बागे-पाटील यांनी हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दावा दाखल करतेवेळी दोघे सुमारे २० महिने वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ॲड. कमलेश गावडे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तो रिक्षा चालक आहे. तर ती खासगी कंपनीत नोकरी करते. तो बारावी शिकला आहे. ती पदवीधर आहे. एप्रिल २०१५ दोघांचा पारंपारिक पध्दतीने पाहणी करून विवाह झाला. काही दिवस सुरळीत संसार केला. दोघांना एक मुलगी आहे. ती आता आठ वर्षांची आहे. सुरळीत संसारानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. २७ सप्टेंबर २०२२ पासून वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. निकालानुसार मुलगी पत्नीकडे असणार आहे.
वैचारिक मतभेदामुळे दोघे 20 महिन्यापासून वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
ॲड. कमलेश गावडे, अर्जदारांचे वकील





